सह्याद्री मित्र संमेलन ५–६ जुलै २०२५ - नाशिक

पहिल्या दोन वर्षांत सह्याद्री मित्र संमेलनाने एक विचार रुजवला—सह्याद्रीच्या वाटांवर भटकणाऱ्या माणसांना एका समान व्यासपीठावर आणण्याचा. कै. अविनाश जोशी यांच्या स्मृतींना अभिवादन करत सुरू झालेला हा प्रवास तिसऱ्या वर्षी अधिक व्यापक आणि अधिक लोकसहभागाचा झाला. यावेळी संमेलन केवळ दोन दिवसांचा कार्यक्रम राहिला नाही,तर त्याआधीच स्वच्छता अभियान, विद्यार्थी ट्रेक आणि सायकल रॅलीच्या माध्यमातून ‘सह्याद्री जागर’ सुरू झाला होता. ५ आणि ६ जुलै २०२५ रोजी झालेल्या तिसऱ्या संमेलनात Adventure Sports Expo, छायाचित्र प्रदर्शन, ज्ञानसत्रे, Conclave, मान्यवरांच्या संवादातून अनुभवांची देवाणघेवाण, पुरस्कार आणि विविध स्पर्धा यांमधून सह्याद्रीशी जोडलेली विविध क्षेत्रे एका छताखाली आली. भटकंतीसोबत साहस, ज्ञान, सुरक्षितता, संवर्धन, छायाचित्रण, कला आणि मैत्री यांचा संगम घडवत तिसऱ्या वर्षाने संमेलनाची व्याप्ती अधिक स्पष्ट केली. एका स्मृतीतून सुरू झालेला हा प्रवास आता केवळ संमेलन न राहता, सह्याद्रीशी नाते जपणाऱ्या एका व्यापक चळवळीचे रूप घेत होता. सह्याद्री मित्र संमेलन — वर्ष तिसरे ५–६ जुलै २०२५ | नाशिक सह्याद्रीच्या वाटेवरून… आता एका चळवळीच्या दिशेने! कै. अविनाश जोशी यांच्या स्मृतींना अभिवादन करत ७ जुलै २०२३ रोजी सुरू झालेल्या सह्याद्री मित्र संमेलनाने पहिल्याच वर्षी सह्याद्रीप्रेमींच्या मनात आपले स्थान निर्माण केले. दुसऱ्या वर्षी संमेलनाचा विस्तार झाला आणि ज्ञान, इतिहास, गिर्यारोहण, सुरक्षितता, छायाचित्रण व सह्यमित्रत्व यांना एक व्यापक व्यासपीठ मिळाले. आता तिसऱ्या वर्षी या प्रवासाने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला. ५ आणि ६ जुलै २०२५ रोजी पार पडलेले तिसरे सह्याद्री मित्र संमेलन हे केवळ दोन दिवसांचे आयोजन नव्हते. त्यापूर्वीपासूनच सह्याद्रीशी जोडणारे विविध उपक्रम सुरू झाले होते आणि मुख्य संमेलनात Adventure Sports Expo, छायाचित्र प्रदर्शन, व्याख्याने, स्लाइड शो, Conclave, पालखी सोहळा, पुरस्कार, स्पर्धा आणि परिसंवाद अशा विविध उपक्रमांनी संमेलनाचे स्वरूप अधिक व्यापक झाले. सह्याद्रीच्या वाटांवरची भटकंती… आता समाजाशी जोडणाऱ्या चळवळीत रूपांतरित होत होती. — संमेलनापूर्वीच सुरू झाला होता ‘सह्याद्री जागर’ तिसऱ्या संमेलनाची खासियत म्हणजे मुख्य कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच सह्याद्रीशी संबंधित विविध उपक्रमांच्या माध्यमातून वातावरण निर्मिती करण्यात आली. १५ जून २०२५ — ब्रह्मगिरी स्वच्छता अभियान सह्याद्रीवर प्रेम करणे म्हणजे केवळ त्याच्या वाटांवर भटकणे नव्हे,तर त्या वाटा आणि परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारीही स्वीकारणे. याच भावनेतून १५ जून रोजी ब्रह्मगिरी स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले. या अभियानात ३५० हून अधिक सह्यमित्रांनी सहभाग घेतला. चार बसेस आणि इतर वाहनांच्या माध्यमातून सहभागी पोहोचले. या उपक्रमाची व्यवस्था जल्लोष आणि गिरीदुर्ग यांच्या माध्यमातून करण्यात आली.त्रंबकेश्वर नगरपालिका व वनखाते यांनी मोलाचे सहकार्य केले.

भटकंतीसोबत संवर्धनाची जबाबदारी, हाच या अभियानाचा संदेश होता. — २१ जून २०२५ — पट्टा किल्ला ट्रेक सह्याद्रीशी नातं जोडणारा आणखी एक मोठा उपक्रम म्हणजे पट्टा किल्ला ट्रेक. या मोहिमेत तब्बल ५०० हून अधिक सहभागी झाले. सहा बसेस आणि काही चारचाकी वाहनांच्या माध्यमातून हा उपक्रम आयोजित करण्यात आला. विशेष म्हणजे संगमनेरहून कासट सरांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे १५० विद्यार्थी या मोहिमेत सहभागी झाले. विद्यार्थ्यांना गड-किल्ले, इतिहास आणि प्रत्यक्ष सह्याद्री अनुभवण्याची संधी मिळाली. संमेलन स्वागताध्यक्ष अॕड.नितिन ठाकरे सर, नाशिकचे प्रसिद्ध आर्किटेक्ट संजय पाटील सर, वनाधिकारी श्री गणेश रणदिवे सर,व इतर अनेक शासकीय अधिकारी, उद्योजक व नामवंत गिर्यारोहक संस्था व व्यक्ती उपस्थित होते. यातून पुढच्या पिढीला सह्याद्रीशी जोडण्याचा प्रयत्न अधिक ठळकपणे समोर आला. — २९ जून २०२५ — सायकल रॅली संमेलनाच्या प्रचारासाठी गिरीदुर्ग आणि नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशन यांच्या संयुक्त आयोजनातून सायकल रॅली काढण्यात आली. सायकल, ट्रेकिंग, गिर्यारोहण आणि निसर्गप्रेम या विविध प्रवाहांना एका विचाराने जोडणारा हा उपक्रम ठरला. अशा प्रकारे मुख्य संमेलनापूर्वीच सह्याद्री मित्र संमेलनाची ऊर्जा नाशिकच्या रस्त्यांवर आणि सह्याद्रीच्या वाटांवर पोहोचली होती.

दिवस पहिला — शनिवार, ५ जुलै २०२५ Adventure Sports Expo — साहसविश्वाची ओळख शनिवार सकाळी १० वाजता Adventure Sports Expo चे उद्घाटन संमेलनाचे स्वागताध्यक्ष अॅड. नितीन ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी विभागीय आयुक्त श्री. राधाकृष्ण गमे, आर्किटेक्ट संजय पाटील, किरण चव्हाण, डॉ. महेंद्र महाजन आणि इतर मान्यवर उपस्थित होते. उद्घाटनानंतर सर्व मान्यवरांनी विविध स्टॉल्सना भेट देऊन सहभागी संस्थांशी संवाद साधला. या Expo मध्ये तब्बल ३३ स्टॉल्स सहभागी झाले. Adventure Sports, गिर्यारोहण, ट्रेकिंग आणि साहसी उपक्रमांशी संबंधित विविध घटकांना एका व्यासपीठावर आणणारा हा उपक्रम संमेलनाच्या वाढत्या व्याप्तीचे प्रतीक ठरला. — ” सह्याद्री कॅमेऱ्यातून… छायाचित्र प्रदर्शन सकाळी १०:३० वाजता पहिल्या मजल्यावरील कलादालनात प्रविण अस्वले आणि डॉ. मनोहर जाधव यांच्या सह्याद्री भटकंतीदरम्यान टिपलेल्या छायाचित्रांचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध वन्यजीव अभ्यासक व छायाचित्रकार श्री. अतुल धामणकर यांच्या हस्ते झाले. यावेळी राधाकृष्ण गमे, आर्किटेक्ट संजय पाटील, प्रसाद पवार, किरण चव्हाण, कृणाल पाटील, डॉ शरद पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते. दीपप्रज्वलन आणि सत्काराने प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. ही छायाचित्रे म्हणजे सह्याद्रीकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन होता. ज्या वाटांवर आपण चालतो, त्या वाटांवर दडलेले क्षण कॅमेऱ्यातून पुन्हा अनुभवण्याची संधी या प्रदर्शनाने दिली. — अतुल धामणकर — Talk & Slide Show सकाळी ११:१५ वाजता कुलकर्णी सभागृहात प्रसिद्ध वन्यजीव अभ्यासक अतुल धामणकर यांचे Talk & Slide Show आयोजित करण्यात आले. सुमारे दीड तास चाललेल्या या कार्यक्रमाला सभागृह तुडुंब भरले होते. वन्यजीव, निसर्ग आणि सह्याद्री यांच्याकडे पाहण्याचा अधिक संवेदनशील आणि अभ्यासपूर्ण दृष्टिकोन या सत्रातून मिळाला. — Conclave — माणसं जोडणारा संवाद संध्याकाळी ७ वाजता पलाश सभागृहात Conclave आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाला २०० हून अधिक सह्यमित्र उपस्थित होते. नाशिकबाहेरून आलेल्या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे या Conclave ला विशेष व्यापकता लाभली. प्रमुख पाहुण्यांमध्ये कोकण विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी, मिलिंद गुणाजी आणि सह्याद्री रत्न उमेश झिरपे यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले. मुंबईहून सतीश गायकवाड, पद्माकर गायकवाड, आत्माराम परब, महेंद्र भंडारे, नंदू चव्हाण, राजेश गाडगीळ, सुरज मालुसरे, दिलीप झुंजारराव, प्रीती पटेल, राजस देशपांडे, प्रांजल वाघ, झेनॉश पटेल आदी सह्यमित्र उपस्थित होते. पुण्याहून प्रा. के. घाणेकर, उमेश झिरपे, संजय शेळके, अमित मराठे, जितेंद्र गवारे, डॉ. सुमीत मंदाळे, भगवान चवले, धनकुडे, तुषार कोठावदे, बाळा कोठावदे आदी मान्यवर उपस्थित होते. एकमेकांची ओळख, गप्पा, अनुभवांची देवाणघेवाण आणि सह्याद्रीविषयीच्या आठवणींमध्ये सर्व उपस्थित रमून गेले. जल्लोष ग्रुपने कार्यक्रमाच्या नियोजनाची व व्यवस्थेची जबाबदारी सांभाळली. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेत या मैत्रीपूर्ण संध्याकाळीची सांगता झाली.

दिवस दुसरा — रविवार, ६ जुलै २०२५ पावसाच्या सरी… ढोलाचा गजर… आणि पालखीचे आगमन! रविवारची सकाळ. सह्याद्रीवर रिमझिम पाऊस कोसळत होता. सकाळी ९:३० वाजता नाशिक ढोलाच्या गजराने संमेलनाच्या मुख्य दिवसाची सुरुवात झाली. आणि सकाळी १०:१५ वाजता गुरुदक्षिणा सभागृहात गिरीदुर्गच्या वारकऱ्यांच्या पालखीचे आगमन झाले. विठ्ठल नामाचा गजर करत वारकऱ्यांनी संपूर्ण सभागृह भक्तिरसात न्हाऊन काढले. सह्याद्री आणि वारकरी परंपरेचा हा अनोखा संगम संमेलनाच्या वातावरणाला एक वेगळीच आध्यात्मिक उंची देणारा ठरला. याच वारकऱ्यांनी महाराष्ट्र गीत सादर करून मुख्य संमेलनाची औपचारिक सुरुवात केली. — मान्यवरांचे स्वागत आणि शिव-विठ्ठल पूजन कोल्हापूरचे डॉ. अमर आडके यांनी निवेदक म्हणून उपस्थितांचे स्वागत केले. प्रमुख पाहुणे मिलिंद गुणाजी, ऋषिकेश यादव, उमेश झिरपे, डॉ. विजय सूर्यवंशी आणि स्वागताध्यक्ष अॅड. नितीन ठाकरे यांना मंचावर आमंत्रित करण्यात आले. सर्व मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आले. त्यानंतर दीपप्रज्वलन, शिवपूजन आणि विठ्ठल पूजन करण्यात आले. सह्याद्री, शिवराय आणि वारकरी परंपरेचा हा सुंदर संगम संमेलनाच्या मूलभूत सांस्कृतिक जाणिवेचे दर्शन घडवणारा होता.

स्वागताध्यक्षांचे प्रास्ताविक स्वागताध्यक्ष अॅड. नितीन ठाकरे यांनी प्रास्ताविकातून संमेलनाची भूमिका, त्यामागचा विचार आणि सह्याद्रीशी जोडलेल्या या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. यानंतर प्रमुख पाहुणे मिलिंद गुणाजी यांची मुलाखत राजेश गाडगीळ यांनी घेतली. या संवादाने खऱ्या अर्थाने मुख्य संमेलनाला सुरुवात झाली. — ज्ञानाचा प्रवाह “महाराष्ट्राची कुळकथा” वक्ते – केतन पुरी महाराष्ट्राच्या इतिहासाची, परंपरेची आणि सांस्कृतिक मुळांची ओळख करून देणारे केतन पुरी यांचे “महाराष्ट्राची कुळकथा” या विषयावरील भाषण अत्यंत माहितीपूर्ण ठरले.

पुरस्कारांचा गौरव

श्रोते मंत्रमुग्ध होऊन हा विषय ऐकत होते. — पुरस्कार सोहळा — कर्तृत्वाचा गौरव तिसऱ्या संमेलनातील मुख्य पुरस्कार वितरण हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा होता.

सह्याद्री रत्न
₹५१०००
श्री. उमेश झिरपे

सह्याद्री आणि गिर्यारोहण क्षेत्रातील प्रदीर्घ व उल्लेखनीय योगदानाबद्दल श्री. उमेश झिरपे यांना ‘सह्याद्री रत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

वाटाड्या
₹११०००
श्री. गुरुनाथ आगिवले

सह्याद्रीच्या वाटांशी असलेले नाते आणि भटक्यांना मार्गदर्शन करण्याच्या कार्याबद्दल गुरुनाथ आगिवले यांचा गौरव करण्यात आला.

ट्रेकर
₹ ११०००
झेनॉश पटेल

ट्रेकिंग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल झेनॉश पटेल यांना ‘ट्रेकर’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

दुर्गसंवर्धन टीम ऑफ द इयर
₹२५०००
शिवदुर्ग प्रतिष्ठान

गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या शिवदुर्ग प्रतिष्ठान परिवाराचा ‘दुर्गसंवर्धन टीम ऑफ द इयर’ म्हणून सन्मान करण्यात आला.

मुंबई रेस्क्यू
₹२५०००
डेला रिसॅार्ट /लोणावळा

डेला रिसॅार्ट /लोणावळा यांचा ‘मुंबई रेस्क्यू’ म्हणून गौरव करण्यात आला.

क्लाईंबिग टिम
₹२५०००
गिरीविराज मुंबई

गिरीविराज मुंबई यांचा ‘क्लाईंबिग टिम ’ म्हणून सन्मान करण्यात आला.

विशेष गौरव

महाजन बंधू, नाशिक

चक्रम हायकर्स, मुंबई

नाशिक क्लाईंबर अँड रेस्क्यू असोसिएशन

सर्जनशील सह्याद्री

नऊ स्पर्धा तिसऱ्या संमेलनाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे सह्याद्रीशी संबंधित विविध कलागुणांना दिलेले व्यासपीठ. एकूण ९ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

स्पर्धांचे विभाग
1. DSLR फोटोग्राफी
2. मोबाईल फोटोग्राफी
3. चित्रकला व पेंटिंग
4. रिल
5. शॉर्ट फिल्म
6. ड्रोन शूट
7. फोटो स्टोरी — मराठी
8. फोटो स्टोरी — इंग्रजी
9. Vlogger २०२५ — स्पर्धा, बक्षिसे व विजेते क्र. स्पर्धा रक्कम विजेते Sponsor १

फोटो-स्टोरी
१ ला ₹5,000 मंगेश दोंडकर
२ रा ₹3,000 मोनाली देशमुख
३ रा ₹2,000 अलोक देशपांडे

फोटोग्राफी
१ ₹11,000 आनंद बोरा
२ रा ₹5,000 पृथ्वीराज पाटील
३ रा ₹3,000 राहुल बुलबुले

मोबाईल
१ ला ₹5,000 प्रिसिलिया मदन
२ रा ₹3,000 शुभम सूर्यवं
३ रा ₹2,000 अमोल तळेकर

रिलमेकर
प्रथम ₹5,000 विशाल साळुंखे रिलमेकर द्वितीय ₹3,000 अमोल तळेकर रिल मेकर तृतीय ₹2,000 केदार ठेपे ५ शॉर्ट फिल्म प्रथम ₹11,000 सुशांत अन्चेकर आनंद बोरा द्वितीय ₹5,000 आनंद बोरा तृतीय ₹3,000 मिलिंद देशपांडे ६ स्केच/चित्रकला प्रथम ₹5,000 डॉ. केदार जोशी द्वितीय ₹3,000 प्रियंका सावंत तृतीय ₹2,000 विनय जाधव ७ ड्रोन शूटर १ ₹5,000 सनी प्रसाद २ रा ₹3,000 अभिषेक नारीवाडीकर ३ रा ₹2,000 अनिकेत कस्तुरे ८ vbloger १ ₹11,000 राजेश आभाळे दुर्गराज Received २ ₹5,000 अमोल लोहार ३ ₹3,000 आदित्य ठाकूर ९ english photostory ₹5,000 क्षितिजा धामणे २ ₹3,000 प्रणव जोशी ३ ₹2,000 आदित्य अहिरराव या सर्व स्पर्धांच्या विजेत्यांना मुख्य संमेलनात पारितोषिके प्रदान करण्यात आली.

“आजची दुर्गभ्रमंती” वक्ते -प्रा. के. घाणेकर ज्येष्ठ अभ्यासक प्रा. के. घाणेकर यांनी “आजची दुर्गभ्रमंती” या विषयावर मार्गदर्शन केले. बदलत्या काळातील गड-किल्ले भटकंती, त्याकडे पाहण्याची दृष्टी आणि अभ्यासपूर्ण दुर्गभ्रमंती याविषयीचे मार्गदर्शन या सत्रातून मिळाले. — “मिशन सह्याद्री” वक्ते – डॉ. गुरुदास नूलकर पुणे सह्याद्रीच्या व्यापक पर्यावरणीय आणि संवर्धनाच्या प्रश्नांकडे अभ्यासपूर्ण दृष्टीने पाहणारे डॉ. गुरुदास नूलकर यांचे “मिशन सह्याद्री” हे भाषण महत्त्वपूर्ण ठरले. सह्याद्री केवळ भटकंतीचे ठिकाण नसून त्याच्या जतनाची जबाबदारीही आपलीच आहे, हा विचार अधोरेखित झाला. — परिसंवाद — “हिमालयीन मोहिमांची पूर्वतयारी” हिमालयीन मोहिमांचे नियोजन, तयारी आणि आव्हाने यावर विशेष परिसंवाद आयोजित करण्यात आला. या परिसंवादात डॉ. सुनील वर्तक, मिलिंद भिडे आणि ओंकार जोशी सहभागी झाले. या तज्ज्ञांशी संवाद साधला राजेश गाडगीळ यांनी. सह्याद्रीपासून हिमालयापर्यंतच्या मोहिमांसाठी आवश्यक असणारी मानसिक, शारीरिक आणि तांत्रिक तयारी याविषयी सखोल माहिती या परिसंवादातून मिळाली. — “सह्याद्रीचे अंतरंग” वक्त्या – डॉ. प्रीती पटेल मुंबई सह्याद्रीच्या भौगोलिक, नैसर्गिक आणि मानवी पैलूंचा वेध घेणारे डॉ. प्रीती पटेल यांचे “सह्याद्रीचे अंतरंग” हे भाषण अत्यंत माहितीपूर्ण ठरले. सह्याद्रीला केवळ डोंगर म्हणून न पाहता त्यामागील निसर्गव्यवस्था आणि जीवन समजून घेण्याची दृष्टी या सत्रातून मिळाली. — “सह्याद्रीतले वन्यजीव” वक्ते – मकरंद केतकर सह्याद्रीच्या जंगलात आपल्या सोबत वावरणाऱ्या वन्यजीवांच्या विश्वाचा मंत्रमुग्ध करणारा परिचय मकरंद केतकर यांनी करून दिला. निसर्गातील प्रत्येक जीवाला समजून घेणे आणि त्याच्याबरोबर सहअस्तित्व राखणे ही सह्याद्रीप्रेमाची खरी कसोटी आहे, हा संदेश या सत्रातून मिळाला. — विशेष उल्लेखनीय कामगिरीचा गौरव तिसऱ्या संमेलनात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सह्यमित्रांचाही सन्मान करण्यात आला. विशेष उल्लेखनीय कामगिरी पुरस्कार : 1. जितेंद्र गवारे, पुणे 2. भगवान चवले, पुणे 3. केवल कक्का, मुंबई 4. रतन अंकोलेकर, नाशिक 5. सुरज मालुसरे , मुंबई यांच्यासह इतर उल्लेखनीय योगदान देणाऱ्या सह्यमित्रांचा गौरव करण्यात आला.