हरीश कापडिया

हरीश कापडिया: हिमालयाचा चालताबोलता इतिहास

मुंबईच्या कापडबाजारातील दुकानात बसलेला एक साधा व्यापारी, आणि काही आठवड्यांनी तोच माणूस लडाखमधील अठरा हजार फुटांच्या खिंडीत बर्फ वितळवून चहा करतोय. हरीश कापडिया यांचे आयुष्य या दोन चित्रांत सामावले आहे.

११ जुलै १९४५ रोजी जन्मलेल्या कापडियांनी वयाच्या पंधराव्या वर्षी पहिला रॉक क्लायम्बिंग कोर्स केला. शिकवणारे होते शेर्पा नवांग गोंबू आणि आंग कामी. तेव्हा हातात आलेला दोर त्यांनी पुढे साठ वर्षांहून अधिक काळ सोडला नाही. त्यांनी आठ आंतरराष्ट्रीय संयुक्त मोहिमांचे नेतृत्व केले आणि लडाख, स्पिती, काराकोरम, पंचचुली अशा अनोळखी प्रदेशांत नव्या वाटा शोधल्या.

ते जितके चढले, तितकेच लिहिले.
‘हिमालयन जर्नल’ चे दीर्घकाळ संपादक म्हणून त्यांनी भारतीय गिर्यारोहणाचा इतिहास नोंदवला.
Exploring the Hidden Himalaya, High Himalaya Unknown Valleys, Meeting the Mountains ही त्यांची पुस्तके त्याची साक्ष आहेत.

सह्याद्रीशी त्यांची नाळ घट्ट आहे.१९८७ मधील Trek the Sahyadris हे पुस्तक आजही सह्याद्रीच्या भटकंतीचे अभ्यासपूर्ण मार्गदर्शक मानले जाते. सह्याद्रीचा जागर करणाऱ्या आपल्या सर्वांसाठी ते प्रेरणास्थान आहे.

२००३ मध्ये रॉयल जिओग्राफिकल सोसायटीचे Patron’s Medal आणि २०१७ मध्ये सोल येथे Piolets d’Or Asia जीवनगौरव पुरस्कार त्यांना मिळाला. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले. पुत्र लेफ्ट. नवांग यांच्या वीरमरणाचे दुःख सोसूनही त्यांनी पर्वतांवरील निष्ठा ढळू दिली नाही.

व्यवसाय आणि वेड यांचा समतोल, शिखरापेक्षा शोधाला महत्त्व आणि अनुभव पुढच्या पिढीला देण्याची ओढ, हीच हरीश कापडियांची खरी उंची आहे.