हिरा पंडित

३५–४० वर्षांपूर्वीचा तो काळ…
जेव्हा गिर्यारोहण ही केवळ छंद नव्हती,
तर धैर्याची कसोटी होती.
साहसी कातळ चढाई ही स्वप्नांच्या पलीकडची गोष्ट मानली जात होती.
आजसारखी आधुनिक, सुरक्षित तांत्रिक साधने नव्हती.
होती ती जेमतेम, भारतीय बनावटीची साधने…
पण त्या साधनांपेक्षा कितीतरी पटीने मजबूत होते
आत्मविश्वास, जिद्द आणि अंगात भिनलेली साहसाची रग.

अशाच काळात
कणकवलीच्या मातीत घडलेला एक मितभाषी युवक
सह्याद्रीच्या राकट,उभ्या कातळांकडे
स्वप्नाळू पण निर्धाराने भरलेल्या नजरेने पाहत होता.
सारखी स्वप्ने उराशी बाळगणारी
चार-दोन वेडी पोरं सोबत मिळाली
आणि एका सुसाट, अनोख्या साहसी प्रवासाला सुरुवात झाली.

देहयष्टी साधी…
शब्द कमी…
पण धैर्य मात्र डोंगराएवढं उंच!
कातळांशी झुंज देताना
भीतीपेक्षा विश्वास मोठा ठरवणारा
आणि अपयशाला कधीही अंतिम शब्द न मानणारा
तो युवक म्हणजे—
आजचे सह्याद्री रत्न…
हिरा पंडित सर

सह्याद्री मित्र संमेलनाच्या निमित्ताने
अखंड साहस, निखळ धैर्य आणि पिढ्यान्‌पिढ्या प्रेरणा देणाऱ्या
या थोर गिर्यारोहकाला
‘सह्याद्री रत्न’ हा सर्वोच्च पुरस्कार
जाहीर करताना
आम्हाला विशेष आनंद आणि अभिमान वाटतो.